Cotton Crop Management : सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक नमूद केली जात आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची बाजारात इंट्री झाली असून नवीन कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार चारशे पर्यंतचा भाव मिळत आहे. हंगामाच्या ऐन सुरुवातीलाच हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
आपल्या राज्यातही काही ठिकाणी पूर्व हंगामी कपाशीचे उत्पादन बाजारात दाखल झाले आहे. मात्र आपल्या राज्यात कापसाचा खरा हंगाम सुरू होईल तो विजयादशमीनंतर. म्हणजे आपल्या राज्यात कपाशीचे पीक आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच मात्र राज्यातील कपाशी पिकावर थ्रिप्स कीटकाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
या कीटकामुळे कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असून उत्पादनात घट येण्याची भीती आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे या कीटकावर वेळीच आणि योग्य पद्धतीने नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक बनले आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सध्या या कीटकासाठी पोषक हवामान तयार झाले असून याचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.
या थ्रिप्स म्हणजे फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे प्रत्यक्ष नुकसान तर होतच आहे शिवाय टोबॅको स्ट्रिक या विषाणूचा प्रसार देखील मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे. त्यामुळे कपाशीवरील फुलकिडींचा प्रादुर्भाव लवकरच ओळखून तत्काळ उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
कसं करणार व्यवस्थापन
- दाट कपाशी लागवड करणे टाळावे. कपाशीची योग्य अंतरावर लागवड केल्यास या किटकाचा प्रादुर्भाव होत नाही.
- अधिक प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर करू नये. संतुलित प्रमाणामध्ये नत्रयुक्त खते वापरल्यास या कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. जर नत्रयुक्त खते अधिक वापरली तर या कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- यासोबतच कपाशी पीक तण विरहित ठेवणे गरजेचे आहे. यामुळे वेळोवेळी कपाशी पिकाची निंदणी आणि कोळपणीची कामे केली पाहिजेत.
- रासायनिक किटकनाशकांसोबत विद्राव्य खते, संप्रेरके तसेच एका कीटकनाशकासोबत दुसरे कीटकनाशक मिक्स करून फवारणी करणे टाळावे.
रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसं मिळवणार?
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या कीटकाच्या प्रभावी नियंत्रणासाठी 100 लिटर पाण्यात फ्लोनीकॅमीड (५० डब्ल्यूजी) 30 ग्रॅम किंवा स्पायनेटोरम (११.७ एससी) 80 मिलि किंवा बुप्रोफेझीन (२५ एससी) 200 मिलि किंवा डायनोटेफ्युरॉन (२० एसजी) 30 ग्रॅम किंवा फिप्रोनील (५ एससी) 300 मिलि फिप्रोनील (१८.८७ एससी) 70.5 मिलि किंवा डायफेन्थुरॉन (५० डब्ल्यूपी) 120 ग्रॅम यापैकी कोणतेही एक कीटकनाशक घेऊन फवारणी करा. फवारणीपूर्वी मात्र तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.