Kanda Bajarbhav : गेल्या ऑगस्ट महिन्यात विक्रमी भाव पातळीवर पोहोचलेले कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय. या वर्षाच्या सुरुवातीला कांद्याचे बाजार भाव समाधानकारक अशा भाव पातळीवर होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात अचानक कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलोचा भाव मिळू लागला.
यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले. परिस्थिती एवढी बिकट बनली होती की, शासनाला कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा करावी लागली. मात्र जुलै महिन्यात कांद्याचे बाजारभाव थोडे वाढले. यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कांद्याला विक्रमी भाव मिळाला.
उत्पादनात आलेली घट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेला कांदा अधिक काळ टिकणारा नसल्याने चाळीत मोठ्या प्रमाणात कांदा सडू लागला यामुळे आवक कमी होऊ लागली. याचा परिणाम म्हणून दरात वाढ झाली. गेल्या महिन्यात काही तज्ञांनी या चालू महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 55 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचतील अशी भविष्यवाणी केली होती. अशा परिस्थितीत, किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने लगेचच उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
याच उपाय योजनेचा एक भाग म्हणून कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कांद्याच्या बाजारभावात घसरण होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. निर्यात मंदावली असल्याने देशांतर्गत कांद्याचा साठा वाढला असून याचा फटका शेतकरी आणि व्यापारी दोघांना बसत आहे.
यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत काळासाठी बाजार समित्या बंद केल्या होत्या. पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या मुद्द्यावर मध्यस्थी करत व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू केलेत. आता मात्र नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा या निर्णयाविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. व्यापाऱ्यांनी आजपासून अर्थातच 20 सप्टेंबर पासून कांदा लिलाव बंद करण्याचे जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील पंधरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 500 पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी आज पासून बेमुदत्त काळासाठी कांदा लिलाव बंद करण्याची घोषणा केली आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये होणाऱ्या लिलावात भाग न घेण्याचे जाहीर केले आहे. याचा परिणाम म्हणून देशातील विविध भागात कांद्याचा तुटवडा तयार होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. बाजारात कांद्याचा शॉर्टज तयार झाला तर किमती वाढू शकतात असा अंदाज काही तज्ञांकडून व्यक्त होत आहे.