Maharashtra Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे राज्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तूट पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जरूर राज्यात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली. पण ऑगस्ट महिन्याची पावसाची तूट भरून काढण्यासाठी सध्या सुरू असलेला पाऊस पुरेसा नाही.
ऑगस्ट महिन्याची जर तूट भरून निघायची असेल तर खूप मोठा पाऊस पडणे अपेक्षित आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत. काल गणरायाच्या आगमनाला राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण गणरायाचे आगमन झाले मात्र पाऊस बरसलाच नाही. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पावसासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काल अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हवामान प्रणालीमुळे कोकणातही पाऊस पडणार आहे. 21 सप्टेंबर पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान चांगला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा व आजूबाजूच्या परिसरात 22 आणि 23 सप्टेंबर रोजी चांगला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात 21 आणि 22 सप्टेंबरला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत राज्यातील कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र म्हणजेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच आगामी तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. यामुळे आता या कालावधीत कसा पाऊस पडतो यावरच पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाचे या महिन्यातील बहुतांशी अंदाज फेल ठरल्याने आता हा तरी अंदाज खरा ठरतो का? याकडे देखील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असेल.