Vande Bharat Metro : देशभरातील महत्त्वाची शहरे परस्परांना वंदे भारत एक्सप्रेसने जोडली जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. या ट्रेनचा तासी कमाल वेग 180 किलोमीटर एवढा आहे. विशेष म्हणजे रेल्वे बोर्डाने या गाडीला 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास परवानगी देखील दिली आहे. पण देशातील अनेक मार्गावर ही गाडी एवढ्या कमाल स्पीडमध्ये धावत नाही.
मात्र असे असतानाही या गाडीने इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत वेगवान प्रवास केला जात आहे असा दावा रेल्वेने केला आहे. याचाच अर्थ या गाडीचा वेग हा इतर एक्सप्रेस गाडीच्या तुलनेत पूर्ण क्षमतेने धावत नसतानाही अधिक आहे. या गाडीमध्ये टॉप क्लास सोई सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे या गाडीची लोकप्रियता ही गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची वाढली आहे. ही देशातील पहिली भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील वेगवेगळ्या मार्गावर या गाडीचे संचालन केले जात आहे. आतापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यात आले असून 24 सप्टेंबर रोजी बिहारची राजधानी पटना आणि पश्चिम बंगाल येथील हावडा दरम्यान आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. 24 सप्टेंबरला या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार असून यामुळे देशातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 26 एवढी होणार आहे.
अशातच मात्र वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगवेगळ्या आवृत्त्या देखील तयार केल्या जात आहेत. वंदे भारत स्लीपर कोच आणि वंदे मेट्रो या दोन नवीन आवृत्त्या आता सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईचे सरव्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मल्ल्या यांनी सांगितल्याप्रमाणे, वंदे भारत स्लीपर कोच मार्च 2024 मध्ये रुळावर धावणार आहे. खरंतर पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका राहणार आहेत.
अशा परिस्थितीत ही गाडी ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा मानस शासनाचा असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. याशिवाय वंदे भारत मेट्रो ही 12 डब्ब्यांची गाडी देखील 2024 च्या अगदी सुरुवातीला सुरू केले जाणार आहे. ही गाडी दोन कमी अंतरावरील शहरांना जोडण्याचे काम करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या दोन शहरांना वंदे मेट्रो कनेक्ट करणार आहे.
त्यामुळे कामानिमित्त रोजाना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ही वंदे भारत मेट्रो गाडी जानेवारी 2024 मध्ये जनसेवेसाठी सुरू केली जाणार आहे. एकंदरीत वंदे भारत स्लीपर कोच ही ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सुरू केली जाणार आहे. तर वंदे मेट्रो ही गाडी शंभर किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर असलेल्या दोन शहरांना जोडण्यासाठी सुरू केली जाणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ज्याप्रमाणे शताब्दी एक्सप्रेस ऐवजी चालवली जात आहे, त्याप्रमाणे आता वंदे भारत स्लीपर कोच राजधानी एक्सप्रेस ऐवजी चालवली जाणार आहे. तसेच दोन कमी अंतरावरील शहरांना परस्परांना जोडण्यासाठी वंदे मेट्रो सुरु होणार आहे. पुढल्या वर्षी या दोन्ही गाड्या सर्वसामान्यांसाठी सुरू केल्या जाणार असून यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.