Varas Nond Online : शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरं पाहता, एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना किंवा वारसांना आतापर्यंत वारस नोंद करण्यासाठी तलाठ्याच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता वारस नोंदची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करून देण्यात आली आहे. देशात गेल्या काही वर्षांपासून सर्व शासकीय कामे ऑनलाईन करण्यावर शासनाचा मदार आहे.
जेणेकरून शासकीय कामात पारदर्शकता आणली जाईल. याच हेतूने महाराष्ट्र राज्य शासनाने देखील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन सातबारा उतारा, आठ अ उतारा, फेरफार उतारा तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान आता राज्य शासनाने यापुढे एक पाऊल टाकले आहे.
आता शेतकऱ्यांना वारस नोंद देखील ऑनलाइन करता येणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. विशेष म्हणजे वारस नोंदी साठी अर्ज केल्यानंतर केवळ 18 दिवसात वारसाची नोंद लागणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण ऑनलाइन पद्धतीने वारस नोंद घरबसल्या कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वारस नोंदी साठी अशा पद्धतीने करा अर्ज
ऑनलाईन वारस नोंद करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. किंवा आपण यासाठी डायरेक्ट https://pdeigr.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तळाशी असलेल्या proceed to login या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर create new user account या पर्यायावर क्लिक करा. यानंतर मग new user sign up नावाचे पेज ओपन होईल. या पेजवर विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. यानंतर मग सेव या बटनावर क्लिक करा, यानंतर मग बॅक या. आणि नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड पुन्हा टाका नंतर कॅप्टचा कोडं भरा आणि पुन्हा एकदा लॉगिन घ्या. त्यानंतर ‘Details’चे पेज उघडेल. त्याठिकाणच्या पर्यायावरील ‘७/१२ mutations’वर क्लिक करा.
मग User is citizen किंवा user is Bank यापैकी योग्य पर्याय निवडा. यानंतर मग प्रोसेस बटणावर क्लिक करा. मग तुमच्या स्क्रीनवर फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क’चे पेज ओपन होईल, त्या पेजवर विचारलेली सर्व माहिती भरा. मग वारस नोंदचा पर्याय तुम्हाला निवडावां लागेल. त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
या ठिकाणी सर्वप्रथम अर्जदाराचे नाव आणि इतर सर्व आवश्यक माहिती भरा. मग पुढे जा बटनावर क्लिक करा. यानंतर एक मेसेज येईल त्याच्या खाली असलेल्या ओके बटनावर क्लिक करा. यानंतर मृत शेतकऱ्याचे नाव किंवा त्याच्या सातबारा उताऱ्यावरील खाते क्रमांक टाका. यानंतर खातेदार शोधा या पर्यायावर क्लिक करा आणि मृत शेतकऱ्याचे नाव दिसेल ते निवडा.
यानंतर मग मृत शेतकऱ्याचा गट क्रमांक निवडा आणि मृत्यूचा दिनांक प्रविष्ट करा. यानंतर समाविष्ट करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनीची माहिती राहील. यानंतर मग अर्जदार हा वारसांपैकी एक आहे का? असा प्रश्न येईल. येथे मग हो किंवा नाही यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.
यानंतर मग वारसांची नावे टाकायची आहेत.यानंतर मग वारसांची माहिती लिहायची आहे. त्यांची नावे इंग्रजीत टाकायची आहेत. तसेच जन्मतारीख भरायची आहे. वय टाकल्यानंतर मग पुढे मोबाईल क्रमांक आणि पिन कोड देखील टाकावा लागणार आहे. यानंतर मग पुढील माहिती भरायचे आहे.
यापुढे मग मृत शेतकऱ्यांसोबत वारसदारांचे असलेले नाते निवडायचे आहे. शेवटी मग सेव या बटनावर क्लिक करायचे आहे. जर वारसदार एकापेक्षा अधिक असतील तर पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि अशीच प्रक्रिया पुन्हा एकदा करायची आहे. आणि सेव या बटनावर क्लिक करायचे आहे.
अशा पद्धतीने जेवढी वारसदार व्यक्तीची नोंद करायची आहे त्यांची नावे भरल्यावर ‘पुढे जा’वर क्लिक करावे लागेल. यांनतर आवश्यक कागदपत्रे देखील या ठिकाणी जोडावे लागणार आहेत. यामध्ये मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करावी लागेल. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. शिवाय मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ’चे उतारेही लागणार आहेत.
या ठिकाणी शपथ पत्र देखील जोडावे लागणार आहे. शपथ पत्र एका कोऱ्या कागदावर लिहून आपण अपलोड करू शकता. ही सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर फाईल अपलोड झाल्याचा मेसेज दिसेल. यानंतर मग एक स्वयंघोषणापत्र समोर येईल. या स्वयंघोषणा पत्राखाली असलेल्या सहमत या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर हा अर्ज तलाठ्याकडे जाईल आणि तेथे अर्जाची छाननी होईल आणि मग मंडलाधिकाऱ्याकडे हा अर्ज जाईल. 18व्या दिवशी मग वारसाची नोंद लागत असते.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना वारस नोंद तीन महिन्याच्या आतच लावावी लागते. यामुळे मृत्यू झाल्याच्या दिनांक पासून तीन महिन्याच्या आत वारस नोंदची प्रक्रिया पूर्ण करणे जरुरीचे आहे.